इतिहास
अखिल भारतीय कीर्तन संस्था ही आपल्या देशातील नारदीय कीर्तनाचा वारसा पुढे नेणारी व कीर्तनकारांच्या पिढ्या घडवणारी महत्त्वाची संस्था आहे. भारतात कीर्तनाची परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे. ही परंपरा केवळ मौखिक स्वरुपात न राहाता या प्राचीन कलेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास व्हावा, हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या या विद्येचा विकास आणि प्रसार व्हावा या हेतूने १९४०पासून ही संस्था निरंतर कार्यरत राहिली आहे. कीर्तनकारांच्या अनेक पिढ्या घडवण्याचे कार्य या अखिल भारतीय कीर्तन संस्थेने केले आहे. अखिल भारतीय कीर्तन संस्था ही मुंबईतील सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावशाली संस्थांपैकी एक महत्त्वाची संस्था आहे. देशातील कीर्तन परंपरेचे जतन व पुढील पिढ्यांकडे त्यांचे संक्रमण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे.
दादर हे मुंबई शहरातील मध्यवर्ती आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. दादर येथे १९४० साली औंध संस्थानच्या राजेसाहेबांच्या (नाव) अध्यक्षतेखाली पहिली कीर्तन परिषद आयोजित करण्यात आली होती. देशभरातील नामवंत व सुप्रसिद्ध कीर्तनकार या परिषदेला उपस्थित होते. या परिषदेच्या समारोपानंतर कै. शंकरराव कुलकर्णी व कै. गोविंदराव भोसेकर यांनी पुढाकार घेऊन अखिल भारतीय कीर्तन संस्थेची स्थापना केली. नारदीय कीर्तनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन नवीन कीर्तनकार तयार करण्यासाठी १९४० साली श्रावण वद्य पंचमीला ही संस्था स्थापन झाली. कै. पार्वतीबाई लिमये यांनी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पांडुरंगाचे मंदिर स्थापन करून कीर्तन प्रशिक्षणाची मूहुर्तमेढ रोवण्यात आली. मुंबईत अथकपणे गेली ८० हून अधिक वर्षे कीर्तन प्रशिक्षणाचे वर्ग चालवणारी, ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. बाल, युवा व महिला कीर्तन महोत्सव हे संस्थच्या उपक्रमांपैकी महत्त्वाचे उपक्रम. त्याचप्रमाणे विठ्ठल मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम सुद्धा संपन्न होतात. कीर्तन प्रशिक्षणासह अनेक नैमित्तिक कार्यक्रम, बाल संस्कार शिबिरे असे कार्यक्रम या वास्तूत आयोजित केले जातात.
संस्थेतील विविध कार्यक्रमांना अनेक मान्यवरांची उपस्थिती
- करवीर पीठाचे आदरणीय शंकराचार्य विद्यानृसिंह भारती
- माजी मुख्यमंत्री कै.मनोहर जोशी
- ज्येष्ठ समीक्षक कै.डॉ.अशोक दा. रानडे
- कालनिर्णयकार कै.जयंत साळगावकर
- माजी शिक्षणमंत्री कै.सुधीर जोशी
- सुप्रसिद्ध व्याख्याते कै.प्रा.राम शेवाळकर
- ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक किरण शांताराम
विविध उपक्रम
- राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मातृदिन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमातील दृश्य
- मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथ महाराज मार्गदर्शन करताना
- बालकीर्तनकार कु. ज्योत्स्ना गाडगीळ हिची मुलाखत घेताना डॉ. समीरा गुजर
- कीर्तन वर्गात मार्गदर्शन करताना प्रा. श.शं. उत्पात
- संस्थेतील कीर्तन वर्गाचा बक्षीस समारंभ

