संस्थेविषयी
अखिल भारतीय कीर्तन संस्थेची स्थापना १९४० रोजी दादर येथे झाली. कीर्तन या विद्येच्या प्रचार व प्रसारार्थ एखादी संस्था असावी या विचारातून ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला व कै. शंकरराव कुलकर्णी व कै. गोविंदराव भोसेकर यांच्या पुढाकाराने या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेली अनेक दशके ही संस्था तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून कीर्तन प्रशिक्षणाचे वर्ग चालवीत आहे. कीर्तनाच्या दूरस्थ अभ्यासक्रमाचा सर्वदूर प्रसार व प्रचार करणे, विविध ठिकाणी कीर्तन महोत्सव भरवणे हे संस्थेचे प्रमुख उद्देश आहेत.
संस्थेच्या स्थापनेला सुमारे ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये स्थापन झालेल्या विठ्ठल मंदिरात सुरू झालेल्या संस्थेचे आता तिमजली सुसज्ज इमारतीत रूपांतर झाले आहे. १९६० साली संस्था भाड्याने वापरत असलेली जागा विकत घेऊन तेथे इमारत बांधण्यात आली. पुढे १९६९ साली दुसऱ्या मजल्यावर एक सभागृह बांधण्यात आले. आज संस्थेची तीन मजली इमारत दिमाखात उभी आहे.
संस्थेच्या तळमजल्यावर श्रीविठ्ठलाचे मंदिर आहे. पहिल्या मजल्यावर सुसज्ज धार्मिक ग्रंथालय व कीर्तन प्रशिक्षण वर्ग, दुसऱ्या मजल्यावर ‘कै. कमलाबाई जोशी सभागृह’ आणि तिसऱ्या मजल्यावर मंगलकार्याच्या व्यवस्थेच्या दृष्टीने राखीव खोल्या व स्वयंपाकघर हे संस्थेच्या सध्याच्या वास्तूचे स्वरुप आहे. कीर्तन अभ्यासक्रमासह भजन, सुगम संगीत व पौरोहित्य याचेही प्रशिक्षण वर्ग दरम्यानच्या काळात सुरू झाले. सन २००० साली संस्थेच्या वास्तूचे पुनर्निर्माण झाले. सन २००१ मध्ये कीर्तन विद्यालयाचे नामकरण ‘साई सत्चरीत्रकार हेमाडपंत कीर्तन विद्यालय’ असे करण्यात आले.
“संस्थेचे कार्य वृद्धींगत करण्यात आपली देणगी मोलाचा वाटा उचलू शकते!”